top of page
Search

जायंट रेड आय च्या शोधात: भाग दुसरा

मागील भागात वाचल्याप्रमाणे जायंट रेड आय फुलपाखरांची अंडी शोधण्यासाठी मी परिसरातील प्रत्येक संभाव्य भक्ष्य वनस्पतीचा छडा लावायचं ठरवलं. सुपारीची किंवा वेताची झाडं आसपास कुठेच नव्हती, नारळाची होती पण ती इतकी उंच की त्यावरची अंडी शोधणं निव्वळ अशक्य. तेव्हा मला जाणवलं की फुलपाखरं बहुदा जमिनीलगतच उडतात त्यामुळे ती उंचावर अंडी घालत असण्याची शक्यता कमी होती. तेव्हा मी कमी उंचीची (३-४ फूट) नारळाची (शास्त्रीय नाव: Cocos nucifera) झाडं शोधण्यास सुरुवात केली. पण त्यांवर कुठेच नुकतीच घातलेली अंडी दिसेनात. तेव्हा मला आणखी एक क्लृप्ती सुचली, आकाराने तंतोतंत नारळासारखीच दिसणारी 'अरेका पाम' (शास्त्रीय नाव: Dypsis lutescens), या शोभिवंत जातीची झाडे मुंबईतील बागांमध्ये सर्वत्र लागवड केलेली आढळतात. ह्या झाडांवर पूर्वी मला 'पामफ्लाय' आणि 'पाम बॉब' ह्या या दोन्ही नारळावरच अंडी घालणाऱ्या फुलपाखरांची अंडी सापडली होती. ifoundbutterflies च्या वेबसाईटवरही ह्या झाडांचा (larval feeding plant) म्हणून संदर्भ मिळाला आणि मग शोध सुरु झाला खऱ्या अर्थाने.

ree
अरेका पाम (Dypsis lutescens) जातीचं शोभेचे माडसदृश्य झाड

रोज सकाळी उठायचं, बागेत जायचं आणि एकेक झाड तपासून बघायचं. फुलपाखरं झाडांच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात, तेव्हा शक्यतो शेंड्याकडची नवीन फुटलेली पान तपासायचं ठरवलं. आमच्या बागेत ह्या प्रजातीची किमान पंचवीस-तीस तरी झाडं असतील आणि तीही सहा एकरात विखुरलेली, मग ती फुलपाखरं पहिल्यांदा दिसली त्या जागेपासून सुरुवात केली पण दिवसभरात काहीच हाती लागलं नाही. बरं ही फुलपाखरं अंडी घालतात ती खूपदा एका पानावर एकच आणि आकाराने साबुदाण्याएवढी, मग ती शोधणार कशी, पण तरीही शोध नेटाने चालू ठेवला.

ree
जायंट रेड आय फुलपाखराचं अंड

मी नेहमी मोबाईलने फोटो काढताना GPS लोकेशन ऑन ठेवूनच फोटो काढतो, ज्यामुळे पिकासा किंवा गुगल फोटो मध्ये Geotag किंवा स्थाननिश्चितीं करणे शक्य होते. ह्या माहितीचा वापर करून मी याआधी आठवडाभरात काढलेल्या फोटोंच्या स्थानांचा एक नकाशा (geo-cluster map) बनवला. त्यावरून असं ध्यानात आलं की ही फुलपाखरे प्रामुख्याने ५० फूट भूभागात फुलांवर फिरतात, तेव्हा त्याच्या आसपासच्या झाडांचा कसून शोध घ्यायचं ठरवलं आणि मग त्याला यश मिळालं. एका अरेका पाम वर दिसलं एक पांढुरकं अंड, मग दुसऱ्या, तिसऱ्या असं करत करत बरीच झाडं मिळाली. त्यातली काही परजीवी गांधील माशांनी भक्ष्य बनवलेली आढळली. ह्या माश्या अंडी, अळी किंवा कोषावस्थेत असलेल्या फुलपाखरांच्या अवस्थांमध्ये त्यांत अंडी घालून आपली प्रजा वाढवतात, त्यामुळे शिशुंवस्थेतल्या माश्यांना आयताच अन्नपुरवठा होतो. जवळपास निम्मी अंडी उबण्याआधीच माश्यांच्या भक्षस्थानी पडतात, पण ही सुद्धा फुलपाखरांची संख्यावाढ नियंत्रित करण्याची निसर्गयोजनाच आहे.

ree
परजीवी गांधीलमाश्यांनी संक्रमित केल्याने काळवंडलेलं अंड

(क्रमशः)


 
 
 

Comments


bottom of page