मुंगी का मॅंटिस?
Updated: Apr 14, 2021
प्रेइंग मँटिस नावाचा हिरवा कीटक तुम्ही पाहिलाय का? कुंग फु पांडा ह्या ऍनिमेटेड चित्रपटातील मधील त्याच्या करामती तर नक्की पहिल्या असतील. प्रार्थनेला बसल्यासारखे पुढचे दोन हात समोर ठेवून बसणार हा कीटक मराठीत "खंडोबाचा घोडा" किंवा "प्रार्थना कीटक" म्हणून ओळखला जातो. ह्याचा जातीतला एक उपप्रकार म्हणजे 'अँट मिमिकिंग मँटिस' किंवा 'मुंगीचे सोंग घेणारा मॅंटिस'. ह्याचं शास्त्रीय नाव 'ओडोमँटिस प्लेनीसेप्स' (Odontomantis planiceps). आता 'मुंगीचे सोंग' हा काय प्रकार आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच, तर त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पहा.
सकाळच्या कोवळ्या उन्हात बागेतल्या गवतावर पाहिलंत तर एखादा 'अँट मिमिकिंग मँटिस' नक्की दिसेल. ते चालताना मधेच थबकतात, किंवा तालात झुलतानाही दिसतात. काही वेळा शिकाऱ्यांना चकवण्यासाठी किंवा भक्ष्याचा मागोवा घेताना तसेच प्रणयकाळात मॅंटिस असे डुलताना दिसतात. अगदी असं वाटेल की एखादा दर्दी रसिकच दाद देतोय.

मुंगीचे सोंग घेणारा 'ओडोमँटिस प्लेनीसेप्स' (Odontomantis planiceps)
नवजात मँटिसचे अनेक शत्रू कीटक आजूबाजूला फिरत असतात आणि त्याच्याकडे संरक्षणासाठी स्वत:ची कोणतीच आयुधं नसतात. अशावेळी निसर्गानेच त्याच्या रक्षणाची सोय करून ठेवलीय. शिशु अवस्थेतील 'अँट मिमिकिंग मँटिस' दिसायला एखाद्या डोंगळ्यासारखा दिसतो, हे फक्त त्याने त्या अवस्थेत घेतलेले सोंग असते. दुरून पाहिलं तर वाटेल एखादा लुटूलुटू चालणारा डोंगळाच. आणि यांच सोंगाला त्याचे शत्रू भुलतात. मुंग्यांचा तीव्र चावा आणि त्यांची वारुळातील सेना ह्यापासून सर्वच कीटक चार हात दूर राहतात, त्यामुळे मुंग्यासारखं सोंग घेऊन ह्या मॅंटिसला आपोपापच फायदा होतो. मात्र तुम्ही नीट निरीक्षण केलंत, तर त्याच्या पुढील पायांच्या ठेवणीमधील फरक लक्षात येईल. 'अँट मिमिकिंग मँटिसची ही अवस्था पहिल्या ३ पायऱ्यांपर्यंतच सीमित असते, चौथ्या पायरीनंतर त्याच्या रंग हिरवा होत जातो, त्याबरोबर त्याचे जबडे आणि पुढचे पाय विकसित होतात आणि तो स्वतः शिकार करू शकतो.
मग आवडला की नाही हा मँटिसचा डान्स?
सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला जरूर भेट द्या https://www.facebook.com/ButterfliesofMulund/
Comments