top of page
Search

फुलपाखरांची नावे: काही सोप्या गोष्टी

Writer: Gyro InfographicGyro Infographic

आपल्या सभोवती आपल्याला अनेक फुलपाखरे दिसतात. प्रत्येक ठिकाणच्या हवामानाप्रमाणे, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आणि तिथे वाढणाऱ्या झाडांप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे आढळून येतात. ह्यांतल्या काही प्रजातींची नावे आपल्याला ऐकून माहित असतात किंवा कुठेतरी वाचनात येतात. पण ही नावे नक्की कशी दिली जातात हे आपण आज पाहू. फुलपाखरांची नावे सामन्यतः त्यांच्या रंग, आकार, उगमस्थान आणि अधिवास (Habitat) ह्याप्रमाणे दिलेली आहेत जसे की कॉमन ग्रास येलो (Common grass yellow) हे छोटे पिवळ्या रंगाचे फुलपाखरू त्याच्या नावाप्रमाणे प्रामुख्याने गवतावर आढळते. काही नावे त्यांच्या विशिष्ठ सवयीमुळे किंवा उडण्याच्या पद्धतीमुळे ही दिली जातात तर काहीवेळा ती त्यांचे अन्न असलेल्या विशिष्ट वनस्पतींप्रमाणेही दिली जातात उदा. पामफ्लाय (Palmfly) ही फुलपाखरे पाम म्हणजे ताडाच्या किंवा नारळाच्या जातीच्या झाडांवर अवलंबुन असतात. एकसारखं नाव असेल तर ती फुलपाखरे साधारण सारख्या आकाराची किंवा रंगसंगतीची असतात. उदा. कॉमन टायगर, प्लेन टायगर आणि ब्लू टायगर ही सर्व वाघासारख्या पट्टेरी बनावटीची असतात.


एकसारख्या नावांमुळे गोंधळ उडण्याचीही शक्यता असते. काहीवेळा एखाद्या फुलपाखराला एकेठिकाणी वेगळ्या तर दुसरीकडे वेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की ग्रेट एगफ्लाय किंवा ब्लु मून बटरफ्लाय ही दोन्ही एकाच फुलपाखराची दोन प्रभागातली नावं आहेत मग अशावेळी जगभर एकच सार्वत्रिक निश्चित नाव असणे गरजेचे ठरते. जीवशास्त्रामध्ये एखाद्या प्राण्याची किंवा वनस्पतीची ओळख पटावी म्हणून त्याच्या जातकुळाची विशिष्ठ वर्गीकरण पद्धती आहे. आपल्याला प्रत्येकाला घरी किंवा मित्रांमध्ये एक वेगळे नाव असते आणि एक आपले कागदोपत्री नाव-आडनाव असते जे आपण व्यवहारात वापरतो. प्रत्येक सजीवाचेही असेच एक सामान्य नाव (Common name) असते आणि एक वैज्ञानिक नाव (Scientific name) असते. ह्या नामकरण पद्धतीला 'द्विपद नामसंज्ञा' किंवा Binomial nomenclature पद्धती म्हणतात. स्विस वनस्पतीशास्त्रज्ञ गॅस्पार्ड बौहिन (Gaspard Bauhin) यांनी पहिल्यांदा वापरलेली ही नामकरण पद्धती स्वीडिश शास्त्रज्ञ कार्ल लिनिअस (Carl Linnaeus) ह्यांनी १७५३ मध्ये रूढ केली. ह्या पद्धतीप्रमाणे पहिले नाव हे जीनस (Genus) म्हणजे वर्गसुचक असून दुसरे स्पीसिज (Species) म्हणजे प्रजातीसुचक असते. उदाहरणार्थ कॉमन ग्रास येलो फुलपाखराचे वैज्ञानिक नाव 'युरमा हेकबी' (Eurema hecabe) असे आहे. ह्यातील Eurema हे वर्गवाचक (Genus name) असून hecabe हे प्रजातीवाचक (Species)आहे. आधुनिक माहितीप्रमाणे यापुढे एक पायरी जाऊन त्यांची पोटजात (subspecies) ही सूचित केली जाते. एका वर्गात साधारण एकसारख्या आकार किंवा रंगसंगतीची फुलपाखरे आढळून येतात, अशाच एका वर्गातल्या दोन फुलपाखरांबद्दल आपण पुढच्या पोस्टमध्ये जाणून घेऊ.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारांनी गेल्या काही वर्षांपासून फुलपाखरांना मराठी नावे देण्याचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम गेल्या काही वर्षांत राबविला गेला आणि २०१९ मध्ये राज्यातील २७९ फुलपाखरांचे नामकरण मराठीत करण्यात आले आणि ते पुस्तकरूपाने प्रकाशित केले गेले आहे.

कॉमन ग्रास येलो (Eurema hecabe)

- क्रमश:

 
 
 

コメント


bottom of page