पाम बॉबच्या प्रतीक्षेत:दुसरा व अंतिम भाग
Updated: Feb 11
पाम बॉबच्या अंड्यांइतकंच त्यांचे जीवनचक्र ही वैशिष्ठयपूर्ण असते आणि अळीच्या रंगरूपात होणारे बदलही लक्षणीय असतात. अंड्यातून बाहेर पडताक्षणी अळीचे अंग लालसर-नारिंगी आणि डोकं तशीच गडद रंगाचं असतं. आपल्या जीवनक्रमाच्या प्राथमिक दोन अवस्थांमध्ये (Early instar) अळी, नारंगी अंगाची असते आणि त्यानंतर फिकट पिवळसर होत जाते. पुढील अवस्थांमध्ये हळूहळू डोकं, शरीरावरचे खंड आणि श्वसनछिद्रे (Spiracles) गडद रंगात विकसित होतात.

ह्या अळ्यांची खासियत म्हणजे ह्या इतर अळ्यांप्रमाणे पानांवर मोकळेपणाने फिरताना दिसणार नाहीत. जन्मल्यानंतर काही तासांनंतरच ह्या अळ्या पानांना दुमड घालून स्वतःभोवती चादरीसारखं लपेटून घेतात. कडक सूर्यप्रकाश, पावसाचा मारा आणि शिकाऱ्यांच्या नजरेपासून बचावासाठी ही जणू त्यांची छोटीशी प्रायव्हेट कॅबिनच असते. पानांना दुमडण्यासाठी लागणारे धाग्यासारखे चिकट स्त्राव ही अळी स्वतःच आपल्या तोंडातून स्त्रवते आणि समोरासमोरच्या कडा ठराविक अंतरावर जोडून वीण घालत जाते. जसा अळीचा आकार वाढतो आणि आतलं पान खाऊन संपत जातं किंवा निसर्गतः वाळून जातं, तेव्हा अळ्या नवीन पानांवर आपलं बस्तान हलवतात. ही सर्व प्रक्रिया अळ्या दरवेळी नवीन पानावर अवघ्या तासाभरात पूर्ण करतात. पुढील आकृतीत ही पूर्ण प्रक्रिया स्थिरचित्रांच्या (Snapshots) कोलाज स्वरूपात दिसेल.

सोबतच्या व्हिडिओत अळीची तोंडाने विणण्याची प्रक्रिया पाहता येईल. हात किंवा कोणत्याही विशेष उपकरणांशिवाय अतिशय सफाईने काम करणाऱ्या अळीला ही प्रक्रिया करतांना पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे.
पुढील बदलांमध्ये डोके तपकिरी पांढऱ्या रंगाचे होत, पाठीवरची काळी मध्यरेषाही गडद होत जाते.रूपांतरणाच्या पाचव्या पायरीला पोचताच अळीच्या शरीरातून पांढऱ्या पावडरसारखा पदार्थ बाहेर पडतो आणि अळीचं शरीर आच्छादून टाकतो. पिवळसर होत अळी कोषात जाण्याची तयारी करते, तिची हालचाल मंदावते आणि एक दोन दिवसात कोषामध्ये सुप्तावस्थेत जाते. कोशनिर्मितीच्या आधी आणि नंतरच्या अवस्थांची काही क्षणचित्रे सोबतच्या आकृतीत पाहता येतील.

सुरवातीला पिवळसर तपकिरी दिसणारा कोष साधारण आठवड्याभरात गडद तपकिरी होऊन त्यांतून नवजात फुलपाखरू बाहेर पडतं.

नुकतंच बाहेर पडल्यावर ह्या फुलपाखरांचा आकार अगदी लहान म्हणजे दहा रुपयांच्या नाण्याइतका असतो आणि पूर्णअवस्थेत त्यांचं आकारमान (पंखाविस्तार) सरासरी ३०-३५ मिमी इतकं होतं. माझ्या हाताच्या तर्जनीवर बसलेल्या ह्या शिशु फुलपाखराकडे पहा म्हणजे त्याचा तुलनात्मक आकार लक्षात येईल.

अशाप्रकारे, २०१९ मध्ये सुरु झालेली ही पाम बॉबचे जीवनचक्र जाणून घेण्याची प्रतीक्षा २०२१ मध्ये ह्या फुलपाखरांच्या रूपाने फळाला आली. अशाच एका नवीन पाहुण्याच्या साथीने पुन्हा भेटूया.. See you soon!!
या लिखाणाकरता वापरलेले संदर्भ
१) https://www.inaturalist.org/taxa/154731-Suastus-gremius
२) https://butterflycircle.blogspot.com/2014/08/life-history-of-palm-bob.html?m=1
३) https://www.ifoundbutterflies.org/sp/563/Suastus-gremius
४)https://en.wikipedia.org/wiki/Suastus_gremius

コメント