बागेतल्या झाडांचे निरीक्षण करताना गोकर्ण, गुलाब, बहावा किंवा बोगनवेल अशा काही वनस्पतींची पाने आपल्याला अर्धवर्तुळाकार आकारात कापलेली दिसतात. फुलपाखरू किंवा पतंगांच्या अळ्या पाने खाताना ती कुरतडल्यासारखी खातात किंवा शिरा सोडून बाकी पूर्ण सफाचट करतात. मात्र काही पाने एखाद्या शल्यचिकित्सकाच्या (Surgeon) सफाईने कापलेली दिसतात. ही किमया असते ह्या पानकापू माश्यांची (सोबतच्या व्हिडीओमध्ये पहा)
मेगाचिलिडी (Megachilidae) ह्या मधमाश्यांशी साधर्म्य दर्शवणाऱ्या कीटकांच्या गटातील ह्या माशा मधमाशांसारख्या घोळक्याने न राहता, एकेकट्या राहतात. ह्यांच्या पोळयांना घरटे म्हणणेच योग्य ठरेल. एखाद्या छोट्या भोकात किंवा खोडाच्या छिद्रात ह्या कापलेल्या पानांचा वापर करून घरटे करतात. त्यात अनेक कक्ष असून प्रत्येक कक्षात एकेक अंडे व त्याला लागणारे पराग/मधुरस साठवलेले असते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या ह्या अन्नावर वाढतात व कालांतराने कोष व वयस्क माशीत रूपांतरित होतात. घरट्यातील हे कप्पे बनवनण्यासाठी त्या हिरव्या पानांचा व राळेचा (Resin) वापर करतात. त्यामुळे कप्पे पाण्यापासून सुरक्षित (वॉटरप्रूफ) राहतात, आत थंडावा राहतो आणि पराग सुकण्यापासूनही सुरक्षित राहतात.
पावसाळ्यानंतर श्रावणात किंवा होळीच्या सुमारास जेव्हा ऊन्हाची सुरुवात होते, तेव्हा ह्या झाडांचे निरीक्षण करा. सकाळच्या ११ ते २ या कालावधीत त्या सक्रिय असतात. त्या अतिशय चलाखीने योग्य डहाळी निवडतात व त्यातील पण आपल्या जबड्यांचा वापर करून कुशलतेने कापतात. एकावेळी एक पान पायांत पकडून त्या घरट्यापर्यंत घेऊन जातात आणि सारखी झाडावर ये-जा करत राहतात. आपल्या परिसरात आढळणाऱ्या काही वनस्पतींचे आणि ती कातरणार्या माशीच्या फोटोंचे संकलन त्यांच्या शास्त्रीय नावांसहित खालील फोटोत पहाता येईल.

फुलांच्या आणि पिकांच्या परागीभवनात ह्या माशा अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. त्यांची कारागिरी जितकी सुंदर तितकंच त्यांचा संचारही पिकांसाठी उपयुक्त. जगात अनेक ठिकाणी अल्फाल्फा गवतावर वाढणारी मेगाचिले रोटुंडा नावाची माशीची प्रजाती व्यावसायिकदृष्ट्या पिकांच्या वाढीसाठी जोपासली जाते. तेव्हा आपणही आपल्या परिसरातील ह्या माशांची माहिती घेऊन त्यांचे संवर्धन करूया.
Comments