डोळे कशासाठी?
फुलपाखरांच्या पाठीवरचे डोळ्यासारखे आकार हे आकर्षक वाटतात हे खरंच, पण त्याचा वापर निव्वळ सौंदर्यासाठी नसतो. मोराच्या पिसाऱ्यावर असलेले डोळ्यांचे आकार आधीच रंगीबेरंगी असलेल्या पिसाऱ्याचं सौंदर्य द्विगुणीत करतात आणि प्रणयासाठी माद्यांना आकर्षित करतात. फुलपाखरे आणि काही पतंगांच्या पंखावरती असे डोळे दिसतात, विशेषतः एगफ्लाय किंवा पॅन्सी जातीच्या फुलपाखरांनी ह्या उत्क्रांतीकाळानुरूप प्रदर्शनाच्या या कलेत निपुणता मिळवली आहे. फुलपाखरांचे खरे डोळे इतर प्राणांसारखेच त्यांच्या डोक्यावर असतात, मग पाठीमागच्या पंखावरच्या ह्या डोळ्यांचं प्रयोजन काय? अनेक प्रजातींच्या फुलपाखरांवर आजवर झालेल्या अभ्यासातून याची दोन प्रमुख कारणे पुढे आली आहेत. पहिले म्हणजे शिकाऱ्यांना घाबरविण्यासाठी.. फुलपाखरे मध प्राशन करतांना पंख पसरून त्यांवरचे डोळे पूर्ण दिसतील अशी बसतात. नीट पाहिलं तर सूर्यकिरणांच्या परावर्तनामुळे ह्या डोळ्यांत रंगही दिसतात. त्यामुळे मोठे डोळे रोखून एखादा प्राणी टिपून बसलाय का असा पक्ष्यांना शंका वाटते आणि ते या फुलपाखरांपासून दूर राहतात.
दुसरा उपयोग म्हणजे हे डोळे तसे म्हटलं तर तिरंदाजीच्या स्पर्धेतल्या एखाद्या लक्ष्यासारखे दिसतात आणि पक्षी त्यावर चोचीने हल्ला करतात. पण हल्ला पंखावर झाल्यामुळे किरकोळ इजा होऊनसुद्धा फुलपाखरांचे मुख्य शरीर शाबूत राहते. मागच्या पंखाचा थोडासा भाग गमावूनसुद्धा फुलपाखरे उडू शकतात किंवा अंडी घालून आपले जीवनचक्र पुढे चालू ठेवतात. जीवावर आलं आणि शेपटावर निभावलं अशी काहीशी यामागची विचारसरणी असावी असंही वैज्ञानिक मानतात.
तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा एखादं मयूरपंखी फुलपाखरू पाहाल तेव्हा ही सारी माहिती मनात आणून त्याच्या पंखावरल्या डोळ्यांचे नीट निरीक्षण करा, कदाचित, "डोळे हे जुल्मी गडे, रोखुनि मज पाहु नका, जादुगिरी त्यात पुरी, येथं उभे राहु नका" असेच तर ही फुलपाखरे आपल्याला सांगत असतील.
Comments