ओलिअँडर हॉक मॉथ - एका पतंगाची गोष्ट
Updated: Apr 16, 2021
सध्या सर्वत्र तगर आणि कण्हेर ह्या झाडांवर तुम्हाला हिरव्या रंगाच्या गलेलठ्ठ अळ्या कोवळ्या पानांची मेजवानी झोडताना दिसतील. हिरव्या ठिपकेवाल्या जाडसर मोठया अळ्या या ओलिअँडर हॉक (Oleander hawk moth), शास्त्रीय नाव: डॅफनिस नेराय (Daphnis nerii) ह्या पतंगाच्या आहेत.
साबुदाण्यासारख्या हिरव्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या या अळ्या लहानपणी ०.५ ते १ सेंमी लांबीच्या असून त्यांच्या शरीरावर एका बाजूस शिंगासारखं टोक दिसते, अळ्या साधारण आठवड्यात पुढे वाढतात. डोळ्यांजवळ मोठे निळे आणि पाठीवर पांढरे ठिपके आणि निळसर पांढरी झाक असलेल्या रेषा असणाऱ्या मोठ्या अळीत त्यांचं लवकरच रूपांतर होतं आणि त्यांची भूकही भरमसाठ होते. ही प्रचंड भूक खरंतर पुढील खडतर प्रवासासाठीची तयारी असते, खाऊन खाऊन टम्म झाल्या की लवकरच ह्या अळ्यांचे रंगरूप बदलते आता त्यांचा रंग तपकिरी आणि अंग गुळगुळीत होते, पांढरे ठिपके काळे पडतात आणि ह्या आल्या पाने सोडून जमिनीवर उतरतात. अलगद पानांच्या आडोशाला मातीत लपून जातात, पानांवर हिरवा रंग आणि मातीत काळसर तपकिरी रंग ही सुद्धा त्यांच्या परिसराशी एकरूप होत लपून जाण्याची स्वसंरक्षणपद्धती. आता त्या कोष बनवतात, एखाद्या अंड्याच्या कवचासारखा तुकतुकीत कोष बनवून ह्या अळ्या त्यामध्ये सुप्तअवस्थेत जातात. साधारण १०-१२ दिवसांनी कोशात पतंगाची वाढ पूर्ण होते, तसतसा कोष पारदर्शक होत जातो आणि आतला पतंग दिसू लागतो. पतंग निशाचर असल्याने ते सूर्यास्तानंतरच कोषातून बाहेर पडतात. ह्या सुरवातीला हिरवा मंद तपकिरी होत होत शेवटचा वयस्क पतंग सैनिकासारख्या शेवाळी रंगसंगतीचा असतो, म्हणूनच ह्याला 'मिलिटरी मॉथ' असेही म्हणतात. वयस्क अवस्थेत नर मादीचे मीलन होते, आणि मादी पुन्हा ह्याच झाडांवर अंडी देते आणि पतंगाचे जीवनचक्र पुन्हा सूरु होते.



आता हे पतंग किंवा फुलपाखरे हीच झाडं का निवडतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल..तर त्याचं उत्तर असं की प्रत्येक फुलपाखरु अथवा पतंगाची अळी अवस्थेत आवडती अशी एक विशिष्ट खाद्य वनस्पती (larval food plant) असते आणि ही वनस्पती सोडून ते इतर कुठे अंडी देत नाहीत किंवा पानंही खात नाहीत. झाडांच्या वरच्या टोकाशी असणारी कोवळी पोपटी पाने हे त्यांचे आवडते खाद्य. कण्हेरीची पाने तसं म्हटलं तर विषारी, गुरांनाही ही पाने खाऊन विषबाधा होते. तगर त्यामानाने विषारी नसली तरी त्यातही अल्कलॉइड आणि ग्लायकोसाईड नावाचे जटिल घटक मोठ्या प्रमाणावर असतात. हाच विषारीपणा ह्या अळ्या आपल्या फायद्यासाठी वापरतात. झाडे आणि अळ्या ह्यांच्यात वाढीसाठी परस्पर संघर्ष उत्क्रांतीमध्ये अनादीकाळापासून सुरु आहे. अळ्यांनी पाने खाऊ नयेत म्हणून ह्या झाडांनी विषारी द्रव्ये आणि चीक यांचे उत्पादन चालू केले, पण अळ्यांनी त्यावरही युक्ती लढवली. अळ्या पानं खाताना पानांच्या कडेकडून मध्यशिरेपर्यंत खातात आणि काही वेळा पर्णशीर कुरतडून देठातून पानाला होणारा रसपुरवठा तोडून टाकतात. ह्यामुळे पानांचा विषारीपणा कमी होतो. शिवाय पानांतले विषारी घटक पचवून अळ्या ही काहीशा तीव्र चवीच्या होत असल्याने शिकारी पक्षी त्यांच्याकडे पाठच फिरवतात. विषाचा हा प्रभाव अनेकदा पुढे वयस्क अवस्थेत फुलपाखरू किंवा पतंग झाल्यावरही कायम राहतो आणि ही फुलपाखरेही पक्ष्यांपासून पूर्णपणे निर्धास्त राहतात.
शेवटचा मुद्दा, बागेची फारच नासाडी होत असेल तर शक्यतो नैसर्गिक उपायांचा वापर करा आणि हानिकारक रसायने शक्यतो टाळा. जर आपल्याकडे अशा अळ्या असतील तर त्यांचे अळी, कोष आणि पतंग होईपर्यंतचे निरीक्षण करण्याची संधी दवडू नका. ह्या पतंगांचे जीवनचक्र काही आठवड्यांचे असते आणि पावसाळ्यानंतर विशेषतः सप्टेंबर महिन्यातच ते प्रामुख्याने आढळून येतात. त्यामुळे उशीर केलात तर कदाचित वर्षभर थांबावं लागेल.
https://www.facebook.com/ButterfliesofMulund/posts/159488939181259
Comments